हॉकी महाराष्ट्रच्या कार्यकारिणीत फारुख शेख यांची निवड
६५ व्या वर्षीही क्रीडा क्षेत्राशी सक्रिय नाते कायम
जळगाव : हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख यांची हॉकी महाराष्ट्रच्या २०२६ ते २०३० या कालावधीच्या कार्यकारिणीत कार्यकारी संचालक म्हणून निवड झाली आहे. पुणे येथील हॉटेल ऑर्किडमध्ये २७ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी आयएएस अंजली कुमार मिश्रा यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
हॉकी महाराष्ट्रच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी आयपीएस कृष्णप्रकाश तर सचिवपदी मनोज बोरा यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी रमेश पिल्ले, मनीषा आकारे आणि गुरमीत सिंग, कोषाध्यक्षपदी कैलास सोनार, तर सहसचिवपदी पूनम दुर्गे आणि महेश कुथाडे यांची निवड झाली. कार्यकारी संचालक म्हणून फारुख शेख यांच्यासह डॉ. केजल भारसाखरे आणि रुपेश चव्हाण यांची निवड झाली. तसेच हेलन मेरी, विक्रम पिल्ले, आकाश चिकटे आणि वैशाली सुळ यांची खेळाडू प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
६५ वर्षांच्या वयातही फारुख शेख क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहेत. हॉकीसोबतच ते फुटबॉल, बुद्धिबळ, जलतरण, व्हॉलीबॉल आणि पॅरालिम्पिक क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध संघटनांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
हॉकी महाराष्ट्रच्या कार्यकारिणीत झालेल्या निवडीबद्दल विविध क्रीडा व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फारुख शेख यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीकडे जळगावच्या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून पाहिले जात आहे.
