सोनी नगर परिसरात गतिरोधकांसह रस्ता सुरक्षा उपाययोजनांची मनसेचे मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन; अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने पाहणी करण्याची मागणी
जळगाव : पिंप्राळा–सावखेडा रोडवरील सोनी नगर परिसरात वाहनांचा वाढता वेग आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता तातडीने गतिरोधक व आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोनी नगर परिसर प्रभाग क्रमांक १० मध्ये येत असून, या मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने स्थानिक नागरिक, पादचारी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः सोनी नगर प्रवेशद्वार, मुरली मनोहर अपार्टमेंटसमोर आणि चंद्रकला अपार्टमेंटसमोर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.
केवळ गतिरोधक बसविण्यापुरती कार्यवाही न करता आवश्यकतेनुसार वेगमर्यादा फलक, सावधानता फलक, रस्ता सुरक्षा चिन्हे, पादचारी सुरक्षेच्या उपाययोजना, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था याबाबतही कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोनी नगरातील नागरिक नियमितपणे महानगरपालिकेचा कर भरतात आणि शहराच्या विकासात आपले योगदान देतात. मग नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क नाही का?
एल-पट्टा रस्त्याचे काम, योग्य व पक्क्या गटारींची व्यवस्था, खुल्या जागेत ऑक्सिजन पार्क, ओपन जिम, बालोद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुख-सुविधा
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना
कर वेळेवर घेता, मग सुविधा देण्यासाठी विलंब का?
अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे…याप्रसंगी उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार शाखा अध्यक्ष युसुफ खाटीक, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, यांच्या सहा सोनी नगरातील रहिवासी नरेश बागडे,विनोद निकम, सरदार राजपूत, भैय्यासाहेब बोरसे, घनश्याम बागुल ,सुनील पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी उपस्थित होते..
