जळगाव – नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी विविध मतदारसंघांत एकूण १५६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. पुनरावृत्ती वगळता प्रत्यक्षात ७२ स्वतंत्र उमेदवारांनी आपले हमेदवारी अर्ज दाखल केले. दिवसभरात १०२ तर आतापर्यंत ७३७ अर्ज विक्री झाली.
गुरुवारी कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी भुसावळ तालुक्यातून, तर माजी मंत्री अनिल पाटील आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अमळनेर तालुक्यातून अर्ज दाखल केले. माजी महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव तालुक्यातील ओबीसी व महिला राखीव जागांसाठी एकूण चार अर्ज भरले. बँकेचे मावळते अध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांनी धरणगाव तालुक्यातून चार, तर आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी पाचोरा तालुक्यातून चार अर्ज भरले. आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री नलिनी पाटील यांनी पारोळा तालुक्यातून दोन, तर पत्नी मृणाल पाटील यांनी एरंडोल तालुक्यातून दोन अर्ज भरले. आमदार नंदकिशोर महाजन, चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगरमधून विनोद तराळ, वरंगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, काँग्रेसचे उदयसिंह पाटील आणि कल्पिता पाटील यांनीही अर्ज दाखल केले.
गेल्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान बँकेतील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सतत वावर होता. त्यावार काही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. यंदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुरुवातीपासूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनापासून सुरक्षित अंतर ठेवणे पसंद केले आहे.
