जळगाव : रस्ता काँक्रिटीकरणाचे सुमारे ९ लाख १० हजार ७६३ रुपयांचे काम सब कॉन्ट्रॅक्टर यांनी केले आहे. या पूर्ण कामाची बीले तयार करून मंजुरीसाठी एकूण बिलाच्या एक टक्के १० हजार रुपयांची लाचेची मागणी करत रक्कम स्वीकारली. सापळ्यात सोमवारी एसीबीच्या पथकाने या दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मनसुलाल शिसोदे (वय ५५, रा. आदर्शगर, जळगाव) तसेच कनिष्ठ अभियंता भागवत वसंत चवरे (वय ३२) अशी लाचखोरा अधिकाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत. पिंपरी खुर्द (ता. धरणगाव) येथे सन २०२५-२६ मधील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे ९ लाख १० हजार ७६३ रुपयांचं काम केले आहे. पुर्ण केलेल्या कामांची एमबी (मोजणी पुस्तिका) व बीले तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी २० हजार रुपये स्वीकारले आहेत. त्यानंतर तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी बांधकाम उपविभाग जि.प. जळगाव या कार्यालयात त्यांच्या कामाची बीले मंजुर झाली नाही. त्यामुळे तक्रारदार विचारपुस करण्यासाठी कार्यालयात गेले असता भागवत चवरे यांनी या कामाच्या बिलांवर सही करून पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्क्या प्रमाणे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक टक्के प्रमाणे १० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शविली. ही तक्रार सोमवारी (२ नोव्हेंबर) एसीबीकडे तक्रारदार यांनी दिली.
या अनुषंगाने जि.प. बांधकाम उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात एसीबीने सोमवारी पडताळणी केली असता भागवत चवरे यांनी तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये लाचेची रक्कम पंचसमक्ष स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम शिसोदे यांना दिली. लाचेची रक्कम शिसोदे यांनी स्विकारून स्वतःकडे घेतली. त्यानंतर एसीबीपथकाने ही रक्कम जप्त केली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अंगझडतीत शिसोदे यांच्याकडून ओपल मोबाईल किंमत ११ हजार ६२० रुपये तसेच रोख रक्कम, चवरेकडून एक मोबाईल व रोख २० हजार ६०० रुपये मिळून आले.
